मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :…. अहोरात्र मुक्ताईनगर शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्या तत्पर सोडवण्यासाठी कार्यरत असलेले मुक्ताईनगर नगरपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी श्री भगवान पांडुरंग वंजारी हे तब्बल 32 वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नगरपंचायत कार्यालयात दि. 3 जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी नगरपंचायतीचे मुख्यधिकारी सतीश पुदाके यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रसंगी नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक, सर्व कर्मचारी , श्री वंजारी यांचे आई-वडील, सौभाग्यवती, भाऊ अशोक वंजारी ,सुरेश वंजारी, सोपान वंजारी, जावई संदीप वराडे ,मुलगा नाना वंजारी यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
नगराध्यक्ष संजना पाटील, उपनगराध्यक्ष देवयानी शिरसाट यांचे सह नगरसेवक ,स्वीकृत नगरसेवक यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री वंजारी यांनी आपल्या सेवाकाळात सुरुवातीला जकात नाका सुपरवायझर म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर सन 2005 पासून त्यांनी पाणीपुरवठा सुपरवायझर म्हणून कार्यरत राहून शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन व देखरेख यशस्वीपणे केली. त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी कार्यामुळे त्यांनी सहकारी कर्मचारी व नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
निरोप समारंभात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे कौतुक केले. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी श्री वंजारी यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ नेहमीच मिळाला असून, त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे विभागाला त्यांची उणीव निश्चितच भासेल, अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास नगरपंचायतीचे कर्मचारी, नगरसेवक, मित्रपरिवार तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्री वंजारी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
