अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर या व्यक्तीकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार पठाण यांना तात्काळ ‘वाय’ दर्जाची शासकीय सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. नगर परिषद मलकापूरचे नगराध्यक्ष अतिकभाई ज्वारीवाले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांना पोलीस निरीक्षक, मलकापूर शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे धमक्या दिल्या जाणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर बाब असल्याचे नमूद करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना माजी नगराध्यक्ष हाजी रशीदखान जमादार, पाणीपुरवठा सभापती शहजाद खान, नगरसेवक रईसखा जमादार, साजिद अहमद खान, जाकीर मेमन, नगरसेवक राजा फुलवाले मुजाहिद पटेल तसेच को-ऑप्टेड नगरसेवक ॲड. शाहिद शेख आदी उपस्थित होते. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात येत असून सुरक्षाविषयक उपाययोजना आणि तपासाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.





