मुक्ताईनगर प्रतिनिधी…….
दिनांक 11/05/2026 पासून मुक्ताईनगर शहर व तालुक्यात “उद्यापासून पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत” अशा आशयाचे खोटे संदेश व्हॉट्सअॅप, फेसबुक व इतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सदर अफवांमुळे खालील गंभीर परिणाम होत आहेत :
1. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे.
2. काही पेट्रोल पंप चालकांकडून याचा गैरफायदा घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करण्याची शक्यता आहे.
3. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
वास्तविक, केंद्र शासनाच्या किंवा तेल कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अशा कोणत्याही दरवाढीची सूचना आजमितीस प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे ही बाब पूर्णतः अफवा आहे.
तरी, आपणास विनंती करण्यात येते की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने खालील कार्यवाही करावी :
1. सदर अफवांचे खंडन करणारे जाहीर निवेदन / प्रसिद्धीपत्रक तात्काळ जारी करावे.
2. अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकांवर भारतीय न्याय संहिता 2023 व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कारवाई करावी.
3. सर्व पेट्रोल पंपांची तपासणी करून सुरळीत विक्री सुरू राहील याची दक्षता घ्यावी व कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई करावी.
4. पोलीस प्रशासनास पेट्रोल पंप परिसरात बंदोबस्त ठेवण्याचे आदेश द्यावेत.
जनतेच्या हितासाठी व तालुक्यात शांतता राखण्यासाठी आपण तातडीने योग्य ती पावले उचलाल अशा आशयाचे निवेदन ॲड.राहुल पाटील, ॲड. अशोक बोदडे, ॲड. देवेंद्र बोदडे , ॲड. कुणाल गवई यांनी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना दिले आहे.
