कोलवड येथे शेतकऱ्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी करून फरार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बुलढाणा यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाणे अप. क्र. 9/26, भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 109(1), 115(2), 352, 351(3), 3(5) अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दि. 20 जानेवारी 2026 रोजी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सुरज मोतीराम पसरटे (वय 23, रा. विजयनगर, सुंदरखेड, ता. जि. बुलढाणा) व आदेश सुनिल राठोड (वय 22, रा. क्रीडा संकुल रोड, आयटीआय कॉलनी, बुलढाणा) हे पुणे येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वाघोली परिसरातील अक्षय संस्कृती अपार्टमेंट, बाईफ रोड, वाघोली, पुणे येथे छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, पोकॉ गजानन गोरले, चापोकॉ निवत्ती पुंड तसेच TAW पथकातील पोहेकॉ राजू आडवे व पवन मखमले यांचा सहभाग होता.






