मलकापूर तालुक्यातील विवरा गावातील अपूर्ण नाला खोलीकरण काम तसेच विवरा-रणगांव रस्ता तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व ग्रामस्थांनी सोमवार, 18 मे 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत आणि शहरप्रमुख हरीदास गणबास यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विवरा गावात गतवर्षी 16 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरांमध्ये घुसल्याने शेकडो कुटुंबांचे नुकसान झाले होते. त्यानंतर गावातील नाला खोलीकरणाचे काम मंजूर झाले होते, मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण अवस्थेत सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच विवरा-रणगांव रस्त्याचे कामही रखडले असून गावाजवळील दलित वस्तीत सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्यांबाबत शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन दिले होते. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांनी नाल्यात उतरून आमरण उपोषणही केले होते. त्यावेळी प्रशासनाने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
उपोषणकर्त्यांनी विवरा-रणगांव रस्त्यावर दुतर्फा नाली बांधकाम करून रस्ता कॉंक्रिटीकरणासह पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच मंजूर नाला खोलीकरण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आमरण उपोषणात बळीराम राणे, शेषराव तायडे, सुखदेव वाढसे, देवराव तायडे, अभिजीत तायडे, विष्णू राणे, उमेश पाटील, विजय चौधरी, शालीग्राम कडू, गणेश पठाडे, समाधान तायडे, राजेंद्र गुरचळ, वासुदेव भोगे, सागर तायडे, चेतन राणे, विलास तायडे, दीपक तळे, सूर्यभान कवडे, दिलदार पिंजारी, शुभम आढाव, अमित राजपूत, नामदेव सोनवणे, विशाल पाटील, राहुल पाटील, प्रदीप हिरळकर, प्रमोद डमाळे, रामदास संबारे, भगवान धांडे, ओंकार पाटील, भूषण पाटील, गजानन नाफडे, घनश्याम चोपडे, मधुकर पाटील, अर्जुन चोपडे, प्रशांत कडू, ईश्वर पाटील, मोहन चोपडे, रोशन बोदडे, ज्ञानेश्वर भगत, यश झाल्टे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
या आंदोलनाला शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष महादेव वनारे, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पुरकर, विभाग प्रमुख सत्तार शाह, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोपान शेलकर, विजय झांबरे आणि हरिदास शिंदे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
