Malkapur

मलकापूरमध्ये पत्रकाराला ‘तुला पाहून घेईन’ची धमकी? पोलीस कर्मचाऱ्याविरोधात पत्रकार संघटना आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पत्रकाराशी अरेरावी करून धमकी दिल्याचा आरोप; पोलीस कर्मचारी चंद्रकांत शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

मलकापूर : तिरंगा रॅलीचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराशी अरेरावी करून धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्यावर तातडीने चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मलकापूर पत्रकार संघटनेने दिला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांना निवेदन सादर करण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी मलकापूर शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकार दीपक इटणारे घटनास्थळी उपस्थित होते. वृत्तसंकलनाचे कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याचा तसेच दमदाटीच्या स्वरात बोलून “तुला पाहून घेईल” अशी धमकी दिल्याचा आरोप पत्रकार संघटनेने निवेदनातून केला आहे.

पत्रकाराने आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याने पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलन करणे हा पत्रकारांच्या कामाचा महत्त्वाचा भाग असून, कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराशी अरेरावी, दमदाटी किंवा धमकीचे प्रकार घडणे ही गंभीर बाब असल्याचे पत्रकार संघटनेने म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि चौकशीत आरोप तथ्य आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचारी चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्यावर त्यांच्या गैरवर्तनाच्या स्वरूपानुसार नियमानुसार तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास मलकापूर पत्रकार संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. पत्रकारांना वृत्तसंकलन करताना सुरक्षित, निर्भय आणि सन्मानपूर्वक वातावरण मिळणे आवश्यक असून, पत्रकारांवर दबाव आणण्याच्या प्रकारांना वेळीच आळा घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर पत्रकार अजय टप, कैलास काळे, करण झणके, शेख निसार, इलाही बक्ष, विजयकुमार वर्मा, मनोज पाटील, नागेश सुरंगे, नारायण पानसरे, शेख जमील, असित इंगळे, भिवा चोपडे, सतीश दांडगे, उमेश हिरुळकर, श्रीकृष्ण भगत, अनिल गोठी आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आता या प्रकरणाची उपविभागीय पोलीस अधिकारी कितपत गांभीर्याने दखल घेतात आणि चौकशीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे मलकापूरच्या पत्रकारांचे लक्ष लागले आहे.

Tags: मलकापूर पत्रकार, पत्रकारांना धमकी, पोलीस कर्मचारी चंद्रकांत शिंदे, मलकापूर पोलीस, पत्रकार संघटना, तिरंगा रॅली, पत्रकार संरक्षण, पोलीस कारवाई, मलकापूर बातमी, बुलढाणा

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply