ईद-ए-मिलादुन्नबीदिनी २६ ऑगस्टला महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर करण्याची मागणी
मलकापूर प्रतिनिधी : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर २६ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर करून दारू तसेच इतर मादक पदार्थांची विक्री बंद ठेवावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी हा धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवशी राज्यातील मद्यविक्री तसेच इतर मादक पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. मद्यविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नशामुक्त महाराष्ट्रासाठी केवळ मद्यविक्री बंद ठेवण्यापुरते मर्यादित न राहता राज्यभर जनजागृती अभियान राबवावे, अशी मागणी दानिश शेख यांनी केली. ईद-ए-मिलादुन्नबीचा दिवस शांतता, बंधुभाव, सामाजिक सौहार्द आणि एकतेचा संदेश देणारा ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
निवेदन देताना अब्दुल रहमान, शेख तालिब, शेख इसाक, शेख तनवीर, शेख इमरान, शेख इरशाद, रेहानुद्दीन, अब्दुल वाजिद, दानिश शेख, शेख रेहान आणि शेख वसीम यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
दरम्यान, ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी राज्यात ड्राय डे जाहीर करण्याच्या या मागणीवर शासन कोणता निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags: ईद-ए-मिलादुन्नबी, ड्राय डे, महाराष्ट्र, दारूबंदी, दानिश शेख, AIMIM, बुलढाणा, मलकापूर, नशामुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्र शासन

