buldhana

एकात्मिक आरोग्यवर्धिनी आढावा बैठकीत कुपोषणमुक्ती, शंभर टक्के आरोग्य तपासणीवर भर

वृत्तपत्र नोंदणी - जफर खान 9881850730

बुलढाणा, दि. १५ : जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात एकात्मिक आरोग्यवर्धिनी आढावा बैठक पार पडली. बैठकीत अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच जिल्ह्यात कुपोषणमुक्तीची विशेष मोहीम आणि नागरिकांची शंभर टक्के आरोग्य तपासणी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले.

बैठकीला आमदार मनोज कायांदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांविरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे पालकमंत्री पाटील यांनी कौतुक केले. मुलींचा जन्मदर वाढणे हे समाजाच्या निरोगी विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घ्यावी, असे निर्देश दिले. अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती किंवा प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी न घालता विलंब न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. विशेषतः आदिवासी भागातील बालकांसह शालेय विद्यार्थ्यांना संतुलित आणि पौष्टिक आहार मिळतो आहे की नाही, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कर्करोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य व दुर्धर आजारांचे वेळेत निदान होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांची शंभर टक्के आरोग्य तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. आजारांचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावीपणे करता येतात. त्यामुळे आरोग्य तपासणीच्या मोहिमेला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनलाही अधिक गती देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालये आणि दवाखाने या मोहिमेत सहभागी करून घेण्यासोबतच शेवटच्या घटकापर्यंत आयुष्मान कार्ड पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत नियमित लसीकरण तसेच विविध आरोग्यविषयक मोहिमांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात नव्याने उभारण्यात येत असलेल्या तसेच नूतनीकरण सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामांची सद्यस्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. आरोग्य केंद्रांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

Tags: बुलढाणा, एकात्मिक आरोग्यवर्धिनी, मकरंद पाटील, आरोग्य विभाग, कुपोषणमुक्ती, आरोग्य तपासणी, गर्भलिंग निदान, पीसीपीएनडीटी, आयुष्मान भारत, प्राथमिक आरोग्य केंद्र

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply