पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी
मलकापूर: स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये भारतीय ग्रंथशास्त्र व माहिती शास्त्राचे आद्य प्रणेते डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती (राष्ट्रीय ग्रंथपाल दिन) महाविद्यालयाच्या मुख्य ग्रंथालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सदस्य श्री. पराग पाटील, डॉ. गौरव कोलते यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. संगीता खर्चे, प्रा. योगेश पाटील, प्रा. पवन गावंडे आणि प्रा. ज्ञानेश्वर शेकोकार हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालय प्रभारी प्रा. संगीता खर्चे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “डॉ. रंगनाथन यांनी भारतात ग्रंथालय शास्त्राची भक्कम पायाभरणी केली. आजच्या डिजिटल युगातही पुस्तकांचे आणि ग्रंथालयाचे महत्त्व अबाधित आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेताना अवांतर वाचन आणि संशोधनात्मक वृत्ती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर केला पाहिजे.”
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध शाखांचे शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन पाहिले आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

