कुऱ्हा येथील कु. सुकन्या जाधव हिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदक

कुऱ्हा येथील कु. सुकन्या जाधव हिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदक
कुऱ्हा येथील कु. सुकन्या जाधव हिला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदक
Advertisement

कुऱ्हा (ता. मुक्ताईनगर) येथील कु. सुकन्या भगवान जाधव हिने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील सामाजिक शास्त्रे प्रशाळेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाची विद्यार्थिनी असलेल्या कु. सुकन्या जाधव हिला शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एम.ए. (डॉ. आंबेडकर विचारधारा) अभ्यासक्रमात सर्व सत्रांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला यंदाचे प्रतिष्ठित ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले.

हे सुवर्णपदक दिवंगत माजी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम सर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने दिले जाते. ३४ व्या दीक्षांत समारंभाच्या वेळी हा सन्मान प्रदान करण्यात आला. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC), बेंगलोरचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास प्रशाळेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे विभागप्रमुख तथा संगणक शास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा. राकेश रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

कु. सुकन्या जाधव ही केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर भाषण, गायन, नाटक, चित्रकला, सूत्रसंचालन आणि वक्तृत्व अशा विविध कला प्रकारांतही प्रवीण असून फुले-शाहू-आंबेडकर विचारांनी घडलेली अष्टपैलू आणि प्रतिभावान विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल मार्गदर्शक, प्राध्यापक, तसेच कुटुंबीयांनी अभिमान व्यक्त केला आहे.

या वेळी तिचे वडील भगवान जाधव, आई दुर्गा जाधव, भाऊ स्वप्नील जाधव उपस्थित होते. तसेच कुऱ्हा येथीलच शुभम अनिल वसतकार या विद्यार्थ्याने एम.ए. इंग्रजी विषयात विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदकाचा मान मिळवला. एका खेडेगावातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीवर घवघवीत यश संपादन करून कुऱ्हा गावाचे नाव उज्ज्वल केल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Subscribe to Viral News Live