बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील शहरी भागात काही दुचाकी, विशेषतः बुलेट वाहनधारकांकडून कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून त्याठिकाणी मोठ्या कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होऊन विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी वाहतूक पोलिसांना अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दिनांक १७ डिसेंबर २०२५ पासून बुलढाणा शहरात विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान जिल्हा वाहतूक शाखेकडून शहरातील विविध भागांमध्ये नियमित वाहन तपासणी करण्यात येत असून, कंपनीने दिलेले मूळ सायलेन्सर काढून नियमबाह्य व कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसविलेल्या दुचाकींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत या मोहिमेत एकूण ३८ बुलेट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही विशेष मोहिम पुढेही सातत्याने सुरू राहणार असून, बुलढाणा शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कोणतेही नियमबाह्य बदल करू नयेत, तसेच कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सरच वापरावेत, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.






