बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोग्यास अपायकारक सुगंधीत पानमसाला आणि गुटखा विक्री करणाऱ्या इसमाला जेरबंद करण्यात यश मिळवले. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी बुलडाणा उपविभागात पेट्रोलिंगदरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की इस्लामपूरा, अमडापूर येथील शेख तैसीफ शेख बुढण (वय 34) हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधीत पानमसाला आपल्या ताब्यातील खोलीतून बेकायदेशीररीत्या विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या सूचनेनंतर पथकाने आरोपीच्या घराची कायदेशीर झडती घेतली असता विविध कंपन्यांच्या गुटखा आणि पानमसाल्यांचा अंदाजे 95,392 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाणे, अमडापूर येथे अप. क्र. 395/2025 नुसार कलम 223, 274, 275, 123 बीएनएस तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 च्या कलम 26(2)(IV) व शिक्षापात्र कलम 59(1) अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. ही मोहीम पोउपनि अविनाश जायभाये, पोना सुनील मिसाळ, अनंत फरताळे आणि पोकों गणेश वाघ (सर्व – स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.






