पिंपळगाव काळे येथे गुरांच्या गोठ्यात लोखंडी चिमट्याने हल्ला; एकजण गंभीर जखमी

जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे गुरांच्या गोठ्याजवळ झालेल्या वादातून एका व्यक्तीवर लोखंडी चिमट्याने हल्ला करण्यात आल्याची घटना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेख अशपाक शेख मुख्तार (वय अंदाजे ३५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी शेख सादीक शेख रफीक यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, पिंपळगाव काळे शिवारातील गट क्रमांक ११६ मध्ये शेख सादीक आणि त्यांचे चुलत बंधू शेख अशपाक यांचा गुरांचा गोठा आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी विशाल सुरेश बोदडे हा गोठ्याजवळ फिरताना दिसल्याने त्याला दोघांनी हटकले होते. यावेळी त्याला गोठ्याच्या परिसरात विनाकारण फिरू नये, असे समजावून सांगण्यात आले होते.
१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेख सादीक आणि शेख अशपाक हे गोठ्यातील जनावरांना चारा-पाणी करीत असताना विशाल सुरेश बोदडे हा हातात पराटी उपटण्याचा लोखंडी चिमटा घेऊन तेथे आला. यावेळी शेख अशपाक यांनी त्याला यापूर्वीच्या घटनेची आठवण करून देत गोठ्याच्या परिसरात येण्याबाबत जाब विचारला. त्यानंतर शेख अशपाक हे बैल बांधत असताना विशाल बोदडे याने अचानक हातातील लोखंडी चिमट्याने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या हल्ल्यात शेख अशपाक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. शेख रेहान शेख जाकीर आणि विष्णू महादेव सावळे यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचेही तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.
जखमी शेख अशपाक यांना शेख सादीक आणि शेख सगीर शेख कदीर यांनी उपचारासाठी सुरुवातीला जळगाव जामोद येथील शासकीय रुग्णालयात आणले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे पाठविले.
या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून, पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल अवदूत पंडित यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची नोंद पोलीस अहवालात आहे. पुढील तपासात घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
