मलकापूरमध्ये दोन कृषी डीपींच्या विद्युत तारा चोरीला; शेतकरी संकटात
मुक्ताईनगर रोडवरील दोन कृषी डीपींच्या विद्युत तारा चोरीला; तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याची शिवसेना (उबाठा)ची मागणी
मलकापूर : मुक्ताईनगर रोडवरील हॉटेल यादगारच्या पाठीमागील कृषी केंद्र क्रमांक १ आणि कृषी केंद्र क्रमांक २ या दोन डीपींवरील विद्युत तारा चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी ४९ पोल आणि एल.टी.च्या ७ पोलवरील विद्युत तारा लंपास केल्या असून, या तारा तातडीने टाकून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाली असून, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असतानाही विद्युत तारा चोरीला गेल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणी येत आहेत. परिणामी हरभरा, गहू यांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा)चे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली संबंधित डीपीवरील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांची भेट घेतली. यावेळी कृषी केंद्र क्रमांक १ आणि कृषी केंद्र क्रमांक २ वरील विद्युत तारा तातडीने ओढून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, गणेश कवळे, विजय कवळे, संजय पाटील, रवींद्र बऱ्हाटे, विकास पाटील, उमेश पाटील, ज्ञानदेव पाटील, जगन्नाथ पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
