buldhana

बुलढाणा सायबर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; डिजिटल अरेस्ट प्रकरणात तिघांना अटक, ५२.७७ लाखांचा मुद्देमाल गोठवला

बुलढाणा : नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दोन कोटी रुपयांसाठी डिजिटल अरेस्ट करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात बुलढाणा सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी अहिल्यानगर येथून शुभम नांगल याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई आणि ठाणे परिसरातून धनराज ऊर्फ रॉबीन विष्णाराम विष्णोई आणि मुनाफ शेख अनवर शेख या दोघांना पाच लाख रुपयांचा धनादेश वटविण्याचा प्रयत्न करताना रंगेहात पकडले आहे.

या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक गजानन कांबळे हे तपास करीत आहेत. तपासादरम्यान सायबर पोलिसांच्या पथकाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथून आरोपी शुभम नांगल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी मुंबई परिसरात कारवाई करत धनराज ऊर्फ रॉबीन विष्णाराम विष्णोई, वय २१ वर्षे, रा. जोधपूर, राजस्थान आणि मुनाफ शेख अनवर शेख, वय २३ वर्षे, रा. अहिल्यानगर यांचा माग काढला.

पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पाळत ठेवून ठाणे परिसरात सिनेस्टाईल पाठलाग केला. त्यानंतर पाच लाख रुपयांचा धनादेश वटविण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

तपासादरम्यान आतापर्यंत NCCRP पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ३१ लाख रुपये, आरोपी शुभम नांगलच्या गोल्ड लोन खात्यातील १४ लाख रुपये तसेच रॉबीन आणि मुनाफ हे धनादेश वटविताना रंगेहात पकडले असता त्यांच्याकडील पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे १ लाख २७ हजार रुपये किमतीचे अॅपल आणि अँड्रॉइड मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून MRM पोर्टलच्या माध्यमातून १ लाख ५० हजार रुपये गोठविण्यात आले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण ५२ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि रक्कम गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झालेली तब्बल दोन कोटी रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी बुलढाणा सायबर पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र प्रयत्न करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या सायबर फसवणुकीचे नियंत्रण केंद्र राजस्थानमध्ये असल्याचे तपासात समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील खान, हेड कॉन्स्टेबल प्रशांत गावंडे, राजदीप वानखडे, विक्की खरात, राजू आडवे तसेच पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे, राहुल इंगळे, क्षितीज तायडे आणि शुभम बोराडे यांचा समावेश होता.

पोलिसांनी गुन्ह्याशी संबंधित विविध बँक खात्यांची माहिती, आरोपींचे जीमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी करून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना नांदुरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून सायबर पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून फसवणुकीच्या संपूर्ण नेटवर्कबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

क्लिष्ट स्वरूपाच्या सायबर गुन्ह्यांमध्ये बुलढाणा सायबर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सायबर पोलिसांविषयी विश्वास निर्माण होत असून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

दरम्यान, डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉड आणि शेअर बाजारातील ट्रेडिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी. सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा NCCRP पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags: बुलढाणा सायबर पोलीस, डिजिटल अरेस्ट, सायबर फसवणूक, नांदुरा, ज्येष्ठ नागरिक फसवणूक, सायबर क्राईम, बुलढाणा पोलीस, डिजिटल फ्रॉड, NCCRP, 1930 हेल्पलाइन

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply