बुलढाणा, दि. ७ जून : फिट इंडिया अभियान आणि जागतिक सायकल दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रविवारी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे ‘Sunday On Cycle’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी तसेच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली.
भारत सरकारच्या फिट इंडिया संकल्पनेनुसार तसेच खेलो इंडिया भारतीय खेल प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या सूचनांनुसार जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना फिट इंडिया संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. सायकलचा नियमित वापर केल्यास शरीराचा सर्वांगीण व्यायाम होऊन उत्तम आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
यानंतर आयोजित सायकल रॅलीला पोलीस अधीक्षक निलेश तांबे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. विशेष म्हणजे या मान्यवरांनी स्वतःही सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. ही रॅली पोलीस मुख्यालयातून कारंजा चौक, त्रिशरण चौक, सुंदरखेड स्टेट बँक मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात परतली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस कुटुंबीय, नागरिक आणि विविध सायकल क्लबच्या सदस्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. त्यांनी निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक निलेश तांबे होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) बाळकृष्ण पावरा, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी आशिष रोही, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सफौ. नसीम मिर्झा, पोहेकॉ. दत्ता पवार, पोहेकॉ. सतीश हातळकर, विजय पैठणे आणि अनंता फरतळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहेकॉ. निलेश रत्नपारखी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी केले.
