मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
मुक्ताईनगर तालुक्यात अवघ्या १६ वर्षे ११ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध आजीच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा आता झिरो नंबर ने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला असल्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी सांगितले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील महादेवाच्या मंदिरात ०३ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास (वय १६ वर्ष ११ महिने) या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आले. मुलगी अज्ञान आहे हे माहित असतानाही आई-वडिलांनी सामाजिक भान विसरून हे लग्न लावून दिले. या बेकायदेशीर कृत्यात त्यांना गावातील आणि बाहेरील काही मध्यस्थांनी खतपाणी घातले.
आजीची ‘ती’ फिर्याद अन् खळबळ…..
आपल्या नातीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून उमापूर (जि. बुलढाणा) येथील आजी सुरपाबाई बाबुराव जामुनकर (६५) यांनी धाडस दाखवत पोलिसांत धाव घेतली. आपल्या नातीचे वय कमी असतानाही तिला संसाराच्या खाईत लोटल्याची तक्रार त्यांनी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी
रामचंद्र बाबुराव जामुनकर (वडील)
२) बबिता रामचंद्र जामुनकर (आई)
३) झुंमकलाल हिरा धांडेकर
४) गजानन रमेश मांजरे (रा. धानोरा)
५) तुकाराम उर्फ मयुर पाटील (वर/नवरदेव – रा. महालखेडा)बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १० आणि ११ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ हे करीत आहेत.