नांदुरा पतिनिधि | Viral News Live

नांदुरा येथील गैबीनगर परिसरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर समाजवादी पक्षाच्या वतीने सोमवारी नांदुरा नगरपरिषद कार्यालयासमोर ‘जन आक्रोश आंघोळ आंदोलन’ करण्यात आले. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. शहरातील सर्वात मोठ्या मुस्लिम वस्तीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
समाजवादी पक्षाच्या वतीने यापूर्वीच नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. गैबीनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास असूनही नगरपरिषदेच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शहरातील इतर भागात नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी उपलब्ध होत असताना गैबीनगरकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आझाद पठाण यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने अखेर जनआक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सकाळी अकरा वाजता कार्यकर्त्यांसह नगरपरिषद कार्यालयात पोहोचून प्रतीकात्मक आंघोळ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी व मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता नारखेडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस कर्मचारी इंगळे, संजय वराडे, गोपनीय विभागाचे श्रीधर काळे तसेच अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी तैनात होते. आंदोलनावेळी शहरातील नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
