मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिकाच्या मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

Advertisement

मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एका लिपिकाच्या कथित मनमानी व अरेरावी वर्तनामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी खामखेड येथील रहिवासी सुरेखा विकास कुयटे या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या 7/12 उताऱ्यावर मक्याची नोंद करण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट दिली होती.

सदर अर्ज दाखल करण्यासाठी त्या कार्यालयातील लिपिक नारखेडे यांच्याकडे गेल्या असता, “हा अर्ज तुम्हाला कोणी लिहून दिला आहे, त्यांना माझ्यासमोर हजर करा,” असे सांगण्यात आले. त्यानंतर अर्ज लिहून देणाऱ्या अर्जनवीसास (वेंडर) कार्यालयात आणण्यात आले असता, लिपिकाने त्यांना जाब विचारत, “तुम्हाला अर्ज लिहिण्याचा अनुभव नाही का? शेतातील पिकांच्या नोंदीची प्रकरणे आमच्या न्यायालयात चालतात का? आम्हालाच सर्व कामे करायची आहेत का?” अशा शब्दांत सुनावले.

Advertisement

इतक्यावर न थांबता, “माझ्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. अशा प्रकारचे किरकोळ अर्ज यापुढे माझ्याकडे पाठवू नका. असे अर्ज पुन्हा पाठवले तर तुम्हाला कार्यालयाच्या आवारात बसू देणार नाही,” अशा शब्दांत अर्जनवीसाला धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे सामान्य अर्जदार व अर्जनवीस दोघेही भयभीत झाल्याचे चित्र आहे.

या घटनेवरून मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्याबाबत मनमानी पद्धती अवलंबल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दैनंदिन येणारे शासकीय अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करणे, कामाचा ताण असल्याचे कारण पुढे करून सामान्य नागरिकांना अर्ज दाखल करण्यापासून रोखणे, तसेच धमकीसदृश भाषा वापरणे हे प्रकार शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीला शोभणारे नसल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

शासकीय नियमानुसार कोणत्याही सामान्य नागरिकाला शासकीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यास मनाई करता येते का? असा कोणता नियम अस्तित्वात आहे का? जर अर्ज स्वीकारला जात नसेल, तर संबंधित नागरिकाने दाद कुणाकडे मागावी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे संबंधित लिपिकावर दंडात्मक किंवा शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी चर्चा सध्या मलकापूर शहरासह परिसरात रंगली आहे.

Subscribe to Viral News Live