चिखली शिवारात हायवे लगत अवैध वेश्याव्यवसायाचा सुळसुळाट; प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप
चिखली शिवारात हायवे लगत अवैध वेश्याव्यवसायाचा सुळसुळाट; प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप

संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली (घोडसगाव) शिवारात हायवे लगत असलेल्या एका हॉटेलच्या मागील बाजूस अवैध वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. याकडे पोलीस प्रशासनासह लोकनियुक्त सरपंच व पोलीस पाटील यांचे दुर्लक्ष होत असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुक्ताईनगर शहरापासून सुमारे ८ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरात रात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली वाढल्याचे नागरिक सांगतात. इतर जिल्ह्यांतून तसेच विदर्भ व मध्यप्रदेश सीमेलगतच्या भागातून मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याचे चित्र असून, रात्री नऊ वाजल्यानंतर हा प्रकार सुरू होऊन पहाटेपर्यंत सुरू राहतो, असा दावा करण्यात येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुचाकी व चारचाकी वाहनांमधून मद्यप्राशन करून येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने हायवेवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातांचा थेट संबंध या अवैध व्यवसायाशी आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या परिसरात अवैध दारूविक्री सर्रास सुरू असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे नवतरुण व आंबट शौकीन मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असून, वादविवाद, हाणामारी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या व्यवसायात गुंतलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी होत नसल्याचा संशय नागरिक व्यक्त करत असून, एड्ससारख्या गंभीर आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम समाजाच्या सार्वजनिक आरोग्यावर होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे चिखली गावाचे नाव बदनाम होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये असून, तातडीने कारवाई करून सदर अवैध व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता पोलीस व महसूल प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
