Malkapur News

मलकापुरात भरदिवसा कारची काच फोडून सोन्याचे दागिने लंपास; चार लाखांचा ऐवज चोरीला

वायरल न्यूज लाइव | मलकापूर प्रतिनिधी मलकापूर : शहरातील भातृमंडळ रोडवरील आयसीआयसीआय बँकेजवळ उभ्या असलेल्या नेक्सॉन कारची मागील दरवाज्याची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने असलेली निळ्या रंगाची बॅग लंपास केल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी सुमारे २.१५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अंदाजे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील शांतिनगर परिसरातील रहिवासी विकास गुलाबसिंह राजपूत यांच्या मातोश्री इंदरकौर राजपूत यांना मलकापुरातील डॉ. चेतन जाधव यांच्या आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आईच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर राजपूत दाम्पत्य हरणखेड येथे आयोजित बारशाच्या कार्यक्रमासाठी जाण्याच्या तयारीत होते. या कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याकरिता त्यांनी एमएच १९ सीझेड ८११९ क्रमांकाची नेक्सॉन कार आयसीआयसीआय बँकेजवळ उभी केली आणि तुलसी ज्वेलर्समध्ये गेले.

ज्वेलर्समधून दागिने खरेदी करून ते परत कारजवळ आले असता कारच्या मागील दरवाज्याची काच फोडलेली दिसून आली. कारमध्ये ठेवलेली सोन्याचे दागिने असलेली निळ्या रंगाची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगेमध्ये गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत, कानातील ६ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आणि प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, असे एकूण २७ ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याची माहिती समोर आली आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शुभम बरडाडे, पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख, पोलीस कर्मचारी संतोष पेंडारकर आणि संतोष कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. तसेच फॉरेन्सिक पथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान, या चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याची माहिती असून, त्याआधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा कारची काच फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्त लिहिपर्यंत पोलीस तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू होती.

Zafar Khan

Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Leave a Reply