एच. जे. थीम महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतली संविधानाच्या उद्देशिकेचे पालन करण्याची शपथ
जळगाव : इक़रा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे जतन करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकारांसोबतच मूलभूत कर्तव्यांचेही प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची रुजवण करणे आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाला इक़रा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. इरफान शेख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. हाफिज शेख, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरदौस शेख यांच्यासह डॉ. तनवीर खान, डॉ. कुलकर्णी, डॉ. युसुफ पटेल, डॉ. चांद खान, प्रा. काझी मुजम्मिल, डॉ. अमीन काझी आणि प्रा. राजू गवरे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये तसेच लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाची भूमिका व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संविधानाप्रती आदर, लोकशाहीप्रती बांधिलकी आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
