मुक्ताईनगर प्रतिनिधी……शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या स्कार्पिओ चारचाकी वाहनाचा मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव उड्डाण पुलावर अपघात झाला. 29 मे रोजी पहाटे परिसरात गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या सेकंड मोबाईल पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जण घटनास्थळावरून पळून गेले. वाहनातील चंद्रकांत विष्णू वाघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर व कैलास कारभारी घोडकी राहणार चिंचोली आडगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती दिली नाही.
स्कार्पिओ गाडी नं.MH 19BU 6695 वाहनाची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन तसेच एक बनावट क्रमांक प्लेट (MH 14 MZ 7023) व स्कार्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे.
तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड राहणार एकनाथवाडी पोस्ट मुगुसवाडी ता. पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये सुमारे १८ गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई होऊन त्यास बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.
या प्रकरणी पोलीस नाईक असीम तडवी यांचे फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून अटक आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत आहे.
***** यांचा होता पोलीस पथकामध्ये समावेश…..
भुसावळ विभागाचे डी वाय एस पी केदार बारगुले , पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक असीम तडवी, पोहेका महेंद्र सुरवाडे , पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पवार, अक्षय वाडे ,सतीश भारुडे ,रितेश चव्हाण यांचा पथकामध्ये समावेश होता.
