शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर या सेवाभावी संस्थेचा १६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात दैनिक सामना वृत्तपत्राचे मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी गणेश गोविंदराव भोंबे यांना तापी–पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
गणेश भोंबे हे गेल्या अनेक दशकांपासून निष्ठेने पत्रकारितेत कार्यरत असून, त्यांच्या कुटुंबाकडून १९८९ पासून ‘न्यूज पेपर एजन्सी’ या नावाने मुक्ताईनगर शहरात वृत्तपत्र वितरणाची सेवा अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या या दीर्घकालीन व समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या राज्यस्तरीय सोहळ्यात पत्रकारितेसह शिक्षण, समाजसेवा, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील राज्यातील ७५ मान्यवरांना तापी–पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एरंडोल येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी भूषविले, तर उद्घाटन खामगाव येथील पांडुरंग दैवज्ञ यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिशक्ती संत मुक्ताई, देवी सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाहीर मनोहर पवार यांनी राज्यगीत सादर करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली. उपस्थित मान्यवरांचा शाल, स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उज्जैनकर फाउंडेशनचे गौरव गीत बार्शी (जि. सोलापूर) येथील कवी अशोक मोहिते यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे सादर केले. तसेच शाहीर मनोहर पवार यांनी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करणारा पोवाडा सादर करत उपस्थितांची विशेष दाद मिळवली. अनेक मान्यवरांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे पुरस्कारार्थी, गुणवंत विद्यार्थी व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे अभिनंदन केले.
दुपारच्या सत्रात मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील ७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प तसेच स्वामी विवेकानंदांचे पुस्तक व छायाचित्र देऊन सन्मान करण्यात आला. हा सत्कार सोहळा जळगाव जिल्ह्याचे शिक्षक नेते एस. डी. भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध कवी डी. बी. जगतपुरिया, शिक्षणमहर्षी एस. ए. भोई, दिनेश पाटील, विनोद सोनवणे, मुक्ताईनगरच्या नवनियुक्त नगरसेविका माधुरी सचिन पाटील, समाजसेवक मनोहर गलवाडे, विनोद डिडवाणीया, प्रा. डॉ. दीपक नागरिक, शंकरराव अनासुने, बाळुभाऊ इटणारे आदींसह उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य व विभागीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शिवचरण उज्जैनकर, खजिनदार संगिता उज्जैनकर, सचिव प्रमोद पिवटे व संपूर्ण कार्यकारिणीने परिश्रम घेतले.






