अवैध रेतीतस्करांवर कारवाई — तरीही रात्री धावणाऱ्या टिप्परमुळे जनतेत प्रश्नचिन्ह

अवैध रेतीतस्करांवर कारवाई — तरीही रात्री धावणाऱ्या टिप्परमुळे जनतेत प्रश्नचिन्ह
Advertisement

मलकापूर परिसरात अवैध रेतीतस्करीविरोधात प्रशासन कारवाई करत असले, तरी रात्रीच्या वेळी रेतीने भरलेले काही टिप्पर धडधडत जाताना दिसतात. त्यांच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले असून “कारवाई नक्की कशी आणि कितपत होते आहे?” असा सवाल आता सार्वजनिक चर्चेत आहे.
दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे दहा वाजता कोटेश्वर–जमनापुरी घाट, मौजा नरवेल येथे मोठी मोहीम राबवून आठ रेतीने भरलेले टिप्पर पकडण्यात आले. या टिप्परची एकूण अंदाजे किंमत तब्बल एक कोटी बासष्ट लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी किरण पाटील व उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईदरम्यान महसूल व पोलिस विभागाचे अधिकारी संयुक्तरीत्या उपस्थित होते. नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी कुलवंतसिंग राजपूत, व्ही. एन. कोल्हे, तलाठी धीरज जाधव, तलाठी राहुल खर्चे, महसूल सेवक पंकज जाधव व सचिन चोपडे, तसेच आरसीबी पोलिस पथक या सर्वांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली.
तरीही नागरिकांचे म्हणणे आहे की, रात्री उशिरा काही टिप्पर निर्भयपणे जाताना दिसतात आणि मोठा आवाज करतात. त्यामुळे “अवैध रेतीतस्करांविरुद्ध खरोखरच कडक पावले उचलली जात आहेत का, की काही टिप्पर सुटतच आहेत?” अशी चर्चा सुरू आहे.
स्थानिकांचा आग्रह आहे की, अवैध उत्खननामुळे पर्यावरण, नदीपात्र आणि रस्त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे केवळ जप्तीपुरते न थांबता — रात्री गस्त वाढवून, तपासणी कडक करून आणि दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
प्रशासनाकडून मात्र सांगितले जात आहे की, मोहिमा सुरूच राहतील आणि अवैध रेतीतस्करीवर कडक पणे नियंत्रण आणले जाईल. आता या कारवाईंचे प्रत्यक्ष परिणाम कितपत दिसतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Subscribe to Viral News Live