प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ३.०’ चा तिसरा टप्पा सुरू; सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगारांची सुवर्णसंधी
बुलढाणा दि.27 (जिमाका): केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’च्या (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा आणि त्यांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये आणि आर्थिक लाभ: या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप कालावधीत उमेदवाराला दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. कामावर रुजू होताना उमेदवाराला ६ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसाहाय्य मिळेल. ही इंटर्नशिप ६ ते ९ महिने कालावधीची असेल.
विविध क्षेत्रे: सेमीकंडक्टर, आयटी (IT), रिन्यूएबल एनर्जी यांसारख्या २० पेक्षा अधिक आधुनिक क्षेत्रांमधील ३००+ आघाडीच्या कंपन्यांमध्ये कामाची संधी उपलब्ध.
पात्रतेचे निकष: अर्जदाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. १० वी, १२ वी उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयटीआय(ITI), डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी(Postgraduate) किंवा एमबीए (MBA) केलेले तरुण यासाठी पात्र आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. उमेदवार सध्या कोणत्याही पूर्णवेळ नोकरीत नसावा.
अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ pminternship.mca.gov.in किंवा mybharat.gov.in वर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या पोर्टलवर जाऊन ‘Apply Now’ वर क्लिक करून आपली माहिती भरावी.
देशातील तरुणांना केवळ पदवी शिक्षण न देता त्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये मिळावीत, यासाठी ही योजना मैलाचा दगड ठरेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.


