मुक्ताईनगर प्रतिनिधी…… जळगाव जिल्हा वार्षिक योजना डी पी डी सी अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल जिल्ह्यात ३१ बचत गट भवनांना मंजुरी पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून प्रत्येक जि. प. गटाला स्वतंत्र व्यासपीठ; महिलांसाठी ९.३० कोटींची योजना
जिल्ह्याच्या विकासाला वेग देतानाच महिलांच्या सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत तब्बल ३१ ठिकाणी महिला बचत गट भवन (प्रभाग संघ इमारती) बांधकामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना प्रथमच स्वतःचे स्वतंत्र आणि सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार असून, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळणार आहे. प्रत्येक भवनासाठी सुमारे ३० लाखांप्रमाणे एकूण ९ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेल्या या निर्णयामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, व जिल्ह्यातील सर्व आमदार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते. महिलांना केवळ योजनांचे लाभार्थी न ठेवता निर्णय प्रक्रियेतील भागीदार बनवण्याचा त्यांचा ठाम निर्धार या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे. ही योजना म्हणजे महिलांच्या स्वाभिमानाचा आणि स्वावलंबनाचा नवा मार्ग ठरणार आहे.”
यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज प्रगतीच्या मार्गावर जातो. त्यामुळे महिलांना मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम करण्यासाठी मजबूत सुविधा निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे.” जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ही भवनं उभारली जाणार असून, यामुळे महिला बचत गटांना बैठक, प्रशिक्षण, उद्योग मार्गदर्शन तसेच विविध आर्थिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी केंद्र उपलब्ध होणार आहे.
*या ठिकाणी मंजूर झाले प्रभाग संग ( महिला बचत भवन)*
*जळगाव तालुका –* भादली बु., वावडदे, शिरसोली प्र.न; *धरणगाव तालुका –* पाळधी खुर्द, बांभोरी प्र.चा., रोटवद; *अमळनेर तालुका –* गडखांब, ढेकू, मंगरुळ; *एरंडोल तालुका –* निपाणे, रवंजे; *भडगाव तालुका* – कोळगाव *; भुसावळ तालुका –* कु-हे प्र. न., तळवेल, फेकरी; *बोदवड तालुका –* ऐनगाव; *चोपडा तालुका –* अडावद, घोडगाव, चहार्डी; *जामनेर तालुका –* नेरी दिगर, पाळधी, फत्तेपूर, वाघारी; *मुक्ताईनगर तालुका –* अंतुर्ली, कु-हे; *पारोळा तालुका –* देवगाव; *पाचोरा तालुका –* नांद्रा, पिंपळगाव हरेश्वर; *रावेर तालुका –* खानापूर, निंभोरा बु.; *यावल तालुका –* भालोद. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिला चळवळीला नवी उंची मिळणार असून, यामुळे “सक्षमीकरणाचा पाया – स्वतःचे भवन” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याची भावना महिलांमध्ये व्यक्त होत आहे.



