मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील पोलीस वसाहतींमधील कर्मचारी निवासस्थान बांधकामाचा मार्ग मोकळा. आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
मुक्ताईनगर प्रतिनिधी :…. मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील पोलीस कर्मचारी वसाहतींच्या दुरवस्थेचा आणि रखडलेल्या बांधकामाचा प्रश्न आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानमंडळात अतारांकित प्रश्नाद्वारे मांडला. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे या वसाहतींच्या नूतनीकरणासाठी आणि नवीन बांधकामासाठी सकारात्मक असल्याची माहिती दिली.
आमदार एकनाथराव खडसे यांनी निदर्शनास आणून दिले होते की, मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील पोलीस वसाहतींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन वसाहतींच्या बांधकामाचा प्रस्ताव प्रलंबित असून, यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागत आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधत त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
आमदार खडसे यांच्या प्रश्नावर उत्तर सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सादर करताना सांगितले
७ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार, मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील शासकीय निवासस्थानांच्या बांधकामाचा समावेश ‘प्राधान्यक्रम यादीत’ करण्यात आला आहे.
बोदवड येथील प्रशासकीय इमारत आणि निवासस्थानांसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची (Project Management Consultant) नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
८ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये या कामांना गती देण्यात आली असून, तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूचित करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यातील या तीन महत्त्वाच्या ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला होता. आमदार खडसे यांनी विधानमंडळात या विषयाचा पाठपुरावा केल्यामुळे आता या वसाहतींच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. यामुळे पोलीस कुटुंबियांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
===================
“पोलीस कर्मचारी अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असतात, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मुक्ताईनगर, बोदवड आणि सावदा येथील वसाहतींचे काम मार्गी लागेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील.” — आमदार एकनाथराव खडसे.




