बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू व जुगाराच्या धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 3 लाख 1 हजार 845 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई 12 मार्च 2026 रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जिल्ह्यात वरली मटका जुगार, अवैध हातभट्टी दारू तसेच इतर अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देऊळगाव माळी येथे वरली मटका जुगार खेळणाऱ्या रामदास भानुदास हिवाळे (वय 54, रा. देऊळगाव माळी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून नगदी व जुगार साहित्य असा 2 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाताळा येथे राहुल सुरेश सुरडकर (वय 29, रा. मलकापूर) याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून नगदी व जुगार साहित्य असा 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेख अजगर शेख अकबर व इतर सहा जणांवर छापा टाकून त्यांच्या ताब्यातून नगदी रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 34 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय दारूबंदी कायद्यानुसारही दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळा बाजार येथे सुनील उखर्डा ढोकणे (वय 42, रा. जवळा बाजार, ता. नांदुरा) याच्याकडून देशी व विदेशी दारूच्या 46 बाटल्या आणि इतर साहित्य असा 4 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अमडापूर येथे गजानन जयराम वानखेडे (वय 26, रा. अमडापूर) याच्याकडून विदेशी दारूच्या 44 बाटल्या आणि मारुती सुझुकी इको कार असा एकूण 1 लाख 59 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, अविनाश जायभाये तसेच पोलीस कर्मचारी विजय पैठणे, अनंता फरतळे, शरद गिरी, गजानन दराडे, युवराज राठोड, दिनेश बकाले, दीपक लेकुरवाळे, एजाज शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, सतीश नाटेकर, राकेश नायडू, सुनील मिसाळ, गणेश वाघ, महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली चव्हाण, अमोल वनारे, अमोल अंभारे आणि चालक निवृत्ती पुंड यांनी सहभाग घेतला. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून करण्यात येत आहे.







