खडकपूर्णा जलाशयातील अवैध रेती उत्खननावर प्रशासनाची निर्णायक कारवाई, दोन बोटी जागेवरच नष्ट

Advertisement

देऊळगाव राजा : खडकपूर्णा जलाशय व नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेत ठोस कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने जलाशयात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी पकडून त्या जागेवरच नष्ट केल्या.

दि. २९ जानेवारी २०२६ रोजी अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रतिबंध पथक गस्तीवर असताना सिनगाव जहागीर, गट क्रमांक ३४१ (सिनगाव जहागीर–खल्लाळगव्हाण रस्ता परिसर) येथे खडकपूर्णा जलाशयात बेकायदेशीर रेती उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान एक मोठी फायबर बोट व एक छोटी इंजिन बोट रेती उपशासाठी वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

पथकाने तत्काळ कारवाई करत दोन्ही बोटी ताब्यात घेऊन त्या किनाऱ्यालगत सुरक्षित ठिकाणी आणल्या व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागेवरच नष्ट केल्या. कारवाईदरम्यान बोटीवर काम करणारे परप्रांतीय मजूर पळून गेले. घटनास्थळी आढळलेले एका मजुराचे आधारकार्ड पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या संयुक्त कारवाईत अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच जलाशयात रेती उपशामुळे तयार झालेले खड्डे बुजविण्यात आले असून रेती वाहतुकीसाठी तयार केलेले कच्चे रस्ते तोडून बंद करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या मोहिमेत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे (सिंदखेड राजा), तहसीलदार वैशाली डोंगरजाळ (देऊळगाव राजा), नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळाधिकारी विजय हिरवे (मेहुणा राजा), महसूल सहाय्यक उमेश गरकल, प्रशांत वाघ, ग्राम महसूल अधिकारी संजय हांडे, आकाश खरात, सरीता वाघ, तेजस शेटे, पोलीस कॉन्स्टेबल माधव कुटे, कलीम देशमुख, शिपाई ताठे, महसूल सेवक वैशाली देशमाने व मारुती बंगाळे यांनी सहभाग घेतला.

खडकपूर्णा जलाशय व नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here