श्री सदगुरू गणपत बाबा पुण्यतिथी व श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त गरजूंना वस्त्रदान श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा सामाजिक उपक्रम

श्री सदगुरू गणपत बाबा पुण्यतिथी व श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त गरजूंना वस्त्रदान श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा सामाजिक उपक्रम
Advertisement

खामगाव / प्रतिनिधी

खामगाव शहरातील सतिफैल परिसरात कार्यरत असलेल्या श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री सदगुरू गणपत बाबा पुण्यतिथी व श्री विश्वकर्मा भगवान जयंतीनिमित्त गरजू व निराधार नागरिकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २६ वर्षांपासून धार्मिक तसेच विविध सामाजिक उपक्रम निस्वार्थ भावनेने सातत्याने राबविले जात आहेत.

Advertisement

“मुख मे हो राम नाम, राम सेवा हाथ मे” हे ध्येय समोर ठेवून समाजातील छताविना राहणारे, पुरेशा वस्त्रांअभावी व दोन वेळच्या अन्नाविना जगणारे उपेक्षित घटक यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश मंडळाने ठेवला आहे. गरीब व गरजूंच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असलेले देविदास शर्मा यांनी सन २००० मध्ये ह. भ. प. गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली. भजनाच्या माध्यमातून मानवी मूल्ये जपणारे अनेक सामाजिक उपक्रम आजपर्यंत अखंडपणे सुरू आहेत.

सध्याच्या समाजात काही ठिकाणी वृद्ध माता-पित्यांना तसेच काम करण्यास असमर्थ असलेल्या अंध व अपंग व्यक्तींना कुटुंबाकडून दुर्लक्षित केले जात असल्याचे चित्र दिसून येते. अशा निराधारांना उघड्यावर राहून भीक मागत जीवन जगावे लागते. खामगाव शहर व परिसरात थंडी, ऊन व पावसात जीवन संघर्ष करणाऱ्या अनेक निराधारांचे वास्तव्य असून, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.

बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, शनिमंदिर, हनुमान मंदिर, फरशी परिसर आदी ठिकाणी जाऊन गोरगरीब व निराधार नागरिकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सदगुरू एकनाथ महाराज व भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर अलीकडे घडलेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमास ह. भ. प. श्री जयरामजी खर्चे महाराज (रानमळा, धुळे), ह. भ. प. शालिग्राम देशमुख महाराज, सेवानिवृत्त पी.एस.आय. शेषरावजी अंभोरे, भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, अरुण कडवकर, दिलीप झापर्डे, लालाजी सांगळे, सागर ठाकूर, दादा ठाकूर, विक्की माने, सुशिला आवलकर, आशा अंधारे, शकुंतला ढवळे, पार्वती सुकाळे, संगीता वाघोळे, जयश्री झापर्डे, जया सुकाळे, शोभा ठाकूर, अंबिका काटकर, वच्छला कुटे, श्रीराजबाई ठाकूर, चैताली फंड, पूजा लाड यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने वर्षभर वृक्षारोपण, रक्तदान, गोरगरीबांना भोजन वाटप तसेच पक्ष्यांसाठी पाणीपात्र वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांना विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here