संघटित गुन्हेगारीवर मोठा प्रहार : मलकापूरातील टोळीवर मकोका कारवाई

संघटित गुन्हेगारीवर मोठा प्रहार : मलकापूरातील टोळीवर मकोका कारवाई
संघटित गुन्हेगारीवर मोठा प्रहार : मलकापूरातील टोळीवर मकोका कारवाई
Advertisement

जिल्ह्यात वाढत्या संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक 138/2025 मधील गंभीर प्रकरणात पुढील कारवाई करण्यात आली आहे.

उक्त गुन्ह्यात किरकोळ कारणावरून नऊ आरोपींनी एकत्र येत पिंप्राळा येथील सतीश गजानन झाल्टे यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला, तसेच साक्षीदारांना मारहाण केल्याची नोंद आहे. तपासादरम्यान आरोपी संकेत सुनिल उन्हाळे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दुखापत आणि घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असल्याचे समोर आले. त्यामुळे या टोळीमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

यासंदर्भात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मकोका) अंतर्गत कारवाईची प्रस्तावना विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्याकडे सादर करण्यात आली होती. त्यावर कार्यवाही करत मा. श्री. रामनाथ पोकळे यांनी प्रस्ताव मंजूर करून खालील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत — संकेत सुनिल उन्हाळे, साहिल सुधाकर पालवे, देव तिलकसिंग राजपूत, अरविंद उर्फ गब्या साळुंके, हर्षल सुभाष घोंगटे, गणेश विजय वायडे, कौशल संतोष घाटे तसेच फरार आरोपी आदित्य जनार्दन वानखेडे आणि ऋषीकेश रामलाल इंगळे.

नववर्ष 2026 च्या प्रारंभी झालेली ही कारवाई जिल्ह्यातील गुन्हेगारीविरुद्धचा ठोस संदेश मानली जात आहे. या निर्णयामुळे भविष्यात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम राहण्यास मदत होईल, असा पोलीस विभागाचा विश्वास आहे.

या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस पथकाने समन्वय साधत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यवाहीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोनि. सुनिल अंबुलकर, सपोनि. नरेंद्र पेंदोर आणि त्यांच्या पथकातील अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Subscribe to Viral News Live