मलकापूर:
स्थानिक पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक विभाग) येथे शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष ‘इंडक्शन प्रोग्राम’ म्हणजेच आरंभिक परिचय व स्वागत सोहळा हा अत्यंत थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शिस्त, शैक्षणिक वातावरण, विविध उपक्रम आणि भविष्यातील संधी यांची सविस्तर माहिती व्हावी, या उदात्त उद्देशाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. युगेश खर्चे, पॉलिटेक्निक विभागाचे इनचार्ज प्रा. संदीप खाचणे, आय क्यू ए सी डीन प्रा. रमाकांत चौधरी आणि अकॅडमीक कोऑर्डिनेटर प्रा. मनोज वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी पॉलिटेक्निकचे सर्व विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने , प्रा. साकेत पाटील, प्रा. महेश शास्त्री आणि प्रा. गजानन सुपे हे देखील मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमास अतिथी म्हणून मलकापूरचे मा. तहसीलदार समाधान सोनवणे, प्रजापती ब्रह्माकुमारी दीपाली दीदी, महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते तसेच खजिनदार सुधीरभाऊ पाचपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थितांनी नवनिर्वाचित विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी दीपाली दीदी यांनी आजच्या युवा पिढीला व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती करताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारसरणी आत्मसात करावी आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेला बळी न पडता आपले ठरवलेले ध्येय गाठावे, असे मोलाचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर प्रा. रुपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना अँटी-रॅगिंग नियमावली आणि त्यासंबंधित कठोर कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालय परिसर पूर्णपणे रॅगिंगमुक्त आणि सुरक्षित असून विद्यार्थ्यांना कोणत्याही भीतीविना निर्भय वातावरणात शिक्षण घेता येईल, असा दृढ विश्वास त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिला.
तसेच मा. तहसीलदार समाधान सोनवणे आणि महाविद्यालयच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाचे वाढते महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि भविष्यातील करिअरच्या विविध सुवर्णसंधी यावर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयातील अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, आजवरचे उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्लेसमेंटच्या उपक्रमांचा विस्तृत आढावा मांडला.
या संपूर्ण भरगच्च कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी सूत्रसंचालन प्रा. राजेश हातळकर यांनी केले. या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. किशोर वाडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अकॅडमीक कोऑर्डिनेटर, सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून या शानदार सोहळ्याची सांगता करण्यात आली.
