मुक्ताईनगर प्रतिनिधी: ……. जिल्ह्यात बनावट आणि अनधिकृत खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाने मुक्ताईनगर येथील एका ॲग्रो एजन्सी’ च्या गोडाऊन वर छापा टाकून लाखो रुपयाचा संशयास्पद साठा ११ एप्रिल रोजी जप्त केला आहे. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पथकाने गोदाम सील केलेले आहे.
13 एप्रिल रोजी पत्रकार तालुका कृषी कार्यालयात याविषयी माहिती घेण्यास गेले असता त्यांना वरिष्ठांना विचारल्याशिवाय माहिती आम्ही देऊ शकत नाही असे उत्तर देण्यात आले होते. तब्बल पाच दिवसांनी कृषी विभागाचे अधिकारी बोलते होत याविषयी माहिती दिली.
संशयास्पद आढळलेला खत साठ्याचे नमुने नाशिक येथील प्रयोग शाळेमध्ये पाठविण्यात आलेले असून संबंधित कंपनीचे परवाना सुद्धा नसल्याचे दिसून येत आहे. तसेच संबंधित कंपनीचे सर्व कागदपत्रे 13 एप्रिल रोजी पत्रव्यवहार करून मागितलेले आहेत. तसेच प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनी आणि एजन्सीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा भरारी पथकातील प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ मस्के यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि दर्जेदार निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभाग सातत्याने कार्यरत आहे. कोणत्याही अनधिकृत विक्रीवर कडक कारवाई केली जाईल असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या कारवाईमुळे बोगस खते विकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना अधिकृत परवाना आणि बॅच नंबर तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




