मुक्ताईनगर प्रतिनिधी:…… संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगरचे सहयोगी अधिष्ठाता तथा कृषी विस्तार विभागाचे प्राध्यापक डॉ. संदीप पाटील यांना इंडियन सोसायटी ऑफ एक्स्टेंशन एज्युकेशन (ISEE), भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने कृषी विस्तार शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व अनुकरणीय कार्य तसेच दीर्घकालीन योगदानाबद्दल ‘आयएसईई फेलो’ हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला.
भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या गोवा येथे आयोजित “शाश्वत अन्न प्रणाली आणि आत्मनिर्भर भारतासाठी डिजिटल तंत्रज्ञान” या राष्ट्रीय परिषदेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर. के. सिंह आणि माजी उपमहासंचालक डॉ. ए. एस. गोतम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल विद्यापीठाच्या विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ. संदीप पाटील हे गेली सुमारे २५ वर्षे कृषी विस्तार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे दहा वर्षांहून अधिक काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून यशस्वी सेवा बजावली आहे. कृषी विज्ञान केंद्र, कराड (जि. सातारा) येथे कृषी विस्तार विशेषज्ञ म्हणून पाच वर्षांहून अधिक काळ कार्य केले असून कृषी महाविद्यालय, धुळे येथे सहा वर्षांहून अधिक काळ अध्यापन व संशोधनाची जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य व प्राध्यापक (कृषी विस्तार) म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते गेल्या पाच वर्षांपासून भारतीय विस्तार शिक्षण सोसायटी व महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्स्टेंशन एज्युकेशनचे कार्यकारी सदस्य तसेच विविध शैक्षणिक व व्यावसायिक संस्थांचे आजीवन सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
अध्यापन, संशोधन, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, युवक कृषी उद्योजकता, आदर्श गाव उपक्रम आणि माहिती तंत्रज्ञानाधारित कृषी सल्ला सेवा या माध्यमांतून त्यांनी व्यापक कार्य केले आहे. कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी आकाशवाणी, दूरदर्शन व वृत्तपत्रांद्वारेही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तिका, कृषी विषयक लेख व विविध शैक्षणिक साहित्य प्रकाशित केले आहे. आतापर्यंत त्यांच्या ७५ हून अधिक संशोधन लेखांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशन झाले असून अनेक पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. विविध संशोधन प्रकल्पांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
डॉ. पाटील यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२२’ (रोख रक्कम रु. २५,०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र) तसेच इंडियन सोसायटी ऑफ एक्स्टेंशन एज्युकेशनचा ‘युवा शास्त्रज्ञ पुरस्कार २०२१’ यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल डॉ. पाटील यांचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषि डॉ. सातप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. संदीप पाटील हे जळगावचे सुपुत्र असून ते कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. उज्ज्वल पाटील यांचे जेष्ठ बंधू आहेत. त्यांना प्राप्त झालेला ‘आयएसईई फेलो’ हा सन्मान मुक्ताईनगर तसेच जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. कृषी विस्तार शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवरील दखल म्हणून या सन्मानाकडे पाहिले जात आहे.
डॉ. संदीप पाटील प्रतिष्ठित ‘आयएसईई फेलो’ पुरस्काराने सन्मानित
Advertisement
Subscribe to Viral News Live



