Top 5 This Week

Related Posts

मलकापुरात बेकायदेशीर एलपीजी रिफिलिंगवर धडक कारवाई; पाच आरोपींवर गुन्हा दाखल, एक लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

मलकापुरात बेकायदेशीर एलपीजी रिफिलिंगवर धडक कारवाई; पाच आरोपींवर गुन्हा दाखल, एक लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्

मलकापुर शहरात बेकायदेशीरपणे एलपीजी गॅस साठवून त्याची रिफिलिंग करणाऱ्या टोळीवर अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच सिलेंडर आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना मिळणाऱ्या एलपीजी गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व अधिनस्त अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

गोपनीय माहितीच्या आधारे मलकापुर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुश्ताक अलीनगर, पारपेठ, लालपुलाजवळील भाग, भालेगाव रोड, शिवाजीनगर, संत श्री रविदासनगर आणि काशीपुरा या परिसरात एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपी जाकीरखान सिकंदरखान, नितीन गुणाजी परसे, लक्ष्मण मोहन हंबर्डे, शेरसिंह धनश्यामसिंह राजपूत आणि शाकीरखान सिकंदरखान यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे प्रेशर पंप, विद्युत मोटार, रबरी नळ्या, नोझल, इलेक्ट्रिक बोर्ड आणि गॅस सिलेंडर असा मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. गुन्हे प्रकटीकरण पथक आणि मलकापुर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles