मिशन परिवर्तन अंतर्गत मोठी कारवाई साखरखेर्डा हद्दीत शेतातून 12.52 लाखांचा गांजा जप्त

Advertisement

बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. साखरखेर्डा पोलीस ठाणे हद्दीत शेतामध्ये गांजाची अवैध लागवड व साठवणूक करणाऱ्या एका इसमास अटक करून सुमारे 12 लाख 52 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यात गांजा तसेच इतर अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले.

Advertisement

दि. 18 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मलकापूर पांग्रा शिवारातील एका शेतामध्ये सुधाकर गायकवाड नामक इसम गांजाची अवैधरित्या लागवड करून त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पंचासमक्ष सदर शेतावर छापा टाकला.

छाप्यात कपाशी व तुरीच्या उभ्या पिकामध्ये गांजाची लागवड, संगोपन आणि साठवणूक केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड वय 65 वर्षे, रा. मलकापूर पांग्रा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा याच्या ताब्यातून 76 किलो 06 ग्रॅम ओलसर गांजा अंदाजे किंमत 11 लाख 40 हजार 900 रुपये तसेच 5 किलो 560 ग्रॅम सुकलेला गांजा अंदाजे किंमत 1 लाख 11 हजार 200 रुपये असा एकूण 12 लाख 52 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम कलम 20 अ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि यशोदा कणसे, पोहेकॉ दिगंबर कपाटे, गजानन दराडे, मपोहेकॉ वनिता शिंगणे, पोना विजय वारुळे, पोकॉ दिपक वायाळ, मंगेश सनगाळे, मनोज खरडे आणि चापोहेकॉ समाधान टेकाळे यांनी सहभाग घेतला.

Subscribe to Viral News Live