VIRAL NEWS LIVE

खामगाव NDPS प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

खामगाव प्रतिनिधी | Viral News Live

खामगाव तालुक्यात दाखल करण्यात आलेल्या कथित NDPS प्रकरणामध्ये मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक यांना जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप पत्रकार मोहम्मद तोसिफ यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कथित अवैध बायोडिझेल प्रकरणाविरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळेच आपल्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

पत्रकार मोहम्मद तोसिफ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे व्हिडिओ संदेशाद्वारे न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता सत्य समोर आणण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

“जर माझा भाऊ दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, मात्र तो निर्दोष असल्यास या संपूर्ण प्रकरणातील खरे आरोपी आणि सूत्रधार समोर आणले गेले पाहिजेत,” असे स्पष्ट मत मोहम्मद तोसिफ यांनी व्यक्त केले. तसेच, पत्रकार आणि सत्यासाठी आवाज उठविणाऱ्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकविण्याचे प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, “आज जर एका पत्रकारासोबत असा प्रकार घडत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय होईल, हा गंभीर प्रश्न आहे. सत्यासाठी लढणाऱ्यांना लक्ष्य केले जात असेल, तर ही चिंतेची बाब आहे.”

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करताना तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. घटनास्थळ परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, डीव्हीआर आणि हार्डडिस्क फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात याव्यात, संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात यावेत, तसेच मोबाईल लाईव्ह लोकेशन आणि टॉवर लोकेशनची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच संबंधित वेळेत गोडाऊन परिसरात कोण आले आणि कोण गेले याची माहिती तांत्रिक तपासातून समोर आणावी, ऑनलाइन सर्व्हेलन्स प्रणाली, डिजिटल डेटा आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यात यावेत, तसेच घटनास्थळावरील सर्व हालचालींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

“सत्य बाहेर आलेच पाहिजे आणि निर्दोषांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका पत्रकार मोहम्मद तोसिफ यांनी मांडली आहे.

ADVERTISEMENT - Footer Banner Ad