

मुक्ताईनगर (प्रतिनिधी):…….
“जासी तरी जायसी संताचिया गावा, होईल विसावा तेणें जीवा.”
जीवाला शाश्वत विश्रांती आणि मनाला अध्यात्मिक शांती मिळवून देणारे ठिकाण म्हणजे ‘संतांचे गाव’. या श्रद्धेपोटीच सध्या आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या मुक्ताईनगरीत भक्तीचा महापूर लोटला आहे. निमित्त आहे, आदिशक्ती संत मुक्ताई आणि योगी चांगदेव महाराज गुरु-शिष्य भेटीच्या यात्रोत्सवाचे. माघ महिन्यातील या परंपरेने अवघे मुक्ताईनगर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या चैतन्यात न्हाऊन निघाले आहे.
गुरू-शिष्य परंपरेचे भावनिक दर्शन
या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे योगी चांगदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांच्यातील गुरु-शिष्य नाते. माघ वद्य महाशिवरात्रीला चांगदेव महाराजांनी पुणतांब्याला समाधी घेतली होती, याच समाधी सोहळ्याचे स्मरण म्हणून ही वारी साजरी केली जाते. महाशिवरात्रीला मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्यासह चांगदेव भेटीला निघतात, तेव्हा अवघ्या विश्वातील गुरु-शिष्य भेटीचा एक अनुपमेय आणि भावनिक क्षण वारकरी अनुभवतात.
नव्या पिढीवर संस्कारांची शिदोरी
विजया एकादशीच्या मंगल पर्वावर, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सुकन्या कुमारी क्रीषीका खडसे यांच्या हस्ते जुन्या मुक्ताई मंदिरात विधीवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला. राजकारणापलीकडे जाऊन आपल्या संस्कृतीची ही पाळेमुळे नव्या पिढीच्या हातून जोपासली जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
सेवेचा वसा आणि प्रशासकीय सुनियोजन
केवळ भक्तीच नाही, तर ‘नर सेवा हीच नारायण सेवा’ या उक्तीचा प्रत्यय येथे येतो. आमदार चंद्रकांत पाटील यांनी केवळ वारकरी आणि भाविकांना फराळ वाटपच केले नाही, तर स्वतः गळ्यात टाळ घेऊन ते भजनात तल्लीन झाले. मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या ‘सेवेकरी फॉर्म्युला’मुळे यंदा दर्शनबारी, चहा-पाणी आणि चप्पल स्टँड यांसारख्या व्यवस्था अतिशय सुटसुटीत झाल्या आहेत. लाखो भाविकांची गर्दी असूनही, शिस्तीमुळे हा यात्रोत्सव सुरक्षित आणि सुखकर झाला आहे.
आरोग्य हीच संपत्ती:…… महाआरोग्य शिबिर
यात्रोत्सवात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेण्यासाठी योगमाया प्रतिष्ठान, सारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने भव्य तीन दिवसीय महाआरोग्य शिबिर राबवले जात आहे. अध्यात्मासोबतच आरोग्याची ही जपणूक विठ्ठल मंदिर परिसरात वारकऱ्यांसाठी मोठी आधारवड ठरत आहे.
विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी मुक्ताईनगरच्या नवीन मंदिरात मुक्काम ठोकला असून, अखंड हरिनामाच्या जागरणाने आसमंत दुमदुमला आहे. खऱ्या अर्थाने, हा यात्रोत्सव म्हणजे केवळ गर्दी नसून संस्कार, अध्यात्म आणि परंपरेचे वैभव आहे. कोथळी ग्रामपंचायत व मुक्ताईनगर नगरपंचायत भाविकांना सोयी सुविधा देत आहे.
काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ हे बंदोबस्त वर लक्ष्य ठेवून आहेत.






