मलकापूर : शहरातील हुसैन बाबा ईदगाह प्लॉट पारपेट परिसरात तब्बल आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात अनेक घरांमध्ये अजूनही पाणी पोहोचत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. काही कनेक्शनवर अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून अनेक ठिकाणी मोटार बसवूनही थेंबभर पाणी मिळत नसल्याने रहिवासी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या परिसरात सध्या अंदाजे 100 ते 150 पाणी कनेक्शन असून इतक्या मोठ्या संख्येमुळे सर्व कनेक्शनपर्यंत समान पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिणामी काही भागात पाणी येते, तर अनेक कनेक्शन पूर्णपणे कोरडीच राहतात. पाणीपुरवठ्यातील ही असमानता दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, विद्यमान व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास ही समस्या कायमस्वरूपी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या परिसराचा पाणीपुरवठा दोन स्वतंत्र झोनमध्ये विभागावा, जेणेकरून प्रत्येक कनेक्शनपर्यंत योग्य दाबाने आणि नियमित पाणी मिळू शकेल. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी हुसैन बाबा ईदगाह प्लॉट पारपेट परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.





