संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीचे औचित्य साधून महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी कुलगुरूंचे स्वागत व सत्कार केला. यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या अध्यापन कार्यपद्धती, शैक्षणिक गुणवत्ता, सुरू असलेले उपक्रम, विद्यार्थी सहभाग तसेच भविष्यातील विकासात्मक आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.
भेटीदरम्यान कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी पदव्युत्तर शिक्षण, विविध करिअर संधी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व समर्पण अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणापुरते मर्यादित न राहता संशोधन, उद्योजकता व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, त्यांच्या अपेक्षा, अडचणी व भविष्यातील उद्दिष्टे जाणून घेऊन उच्च शिक्षणाच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन व माहिती दिली.
मार्गदर्शनपर भाषणात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी अत्यल्प मनुष्यबळ व मर्यादित संसाधने असूनही महाविद्यालयात सुरू असलेल्या गुणवत्तापूर्ण कार्याबाबत समाधान व्यक्त केले. भविष्यात महाविद्यालयाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली (ICAR) यांचे मानांकन व मान्यता (अॅक्रेडिटेशन) प्राप्त करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच गुणवत्तावाढ, नवोन्मेषी अध्यापन पद्धती, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन यावर भर देण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाचा आढावा घेतल्यानंतर कुलगुरूंनी महाविद्यालय प्रक्षेत्र, विविध प्रात्यक्षिक घटक, ग्रंथालय तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहे यांना भेट देऊन उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला . सातपुडा जातीच्या कुक्कुटपालन युनिटचे उद्घाटन करण्यात आले,
या कार्यक्रमास डॉ. गणेश देशमुख, डॉ. रियाज शेख, प्रशांत नागे, सुशांत उके, डॉ. कुशल ढाके, डॉ. सागर बंड, डॉ. सागर पाटील, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. आबासाहेब पारडे, डॉ. मनीषा पालवे, डॉ. ऐश्वर्या पाटील, भूषण जगताप, विवेक राऊत, सिद्धार्थ काळे, गणेश गावंडे, वर्षा सोमानी , अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सागर पाटील यांनी केले

Advertisement
Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here