मुक्ताई यात्रोत्सवानंतर ‘आईसाहेबांचा’ क्षीणभाग दूर करण्यासाठी दि.१९ फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र कोथळीत ‘प्रक्षाळ पूजा’…..साखर-लिंबू आणि औषधी काढ्याने होणार महाअभिषेक.
मुक्ताईनगर । प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या श्री संत मुक्ताई यात्रोत्सवात लाखो भाविकांच्या उपस्थितीनंतर, आईसाहेब मुक्ताईंना आलेला थकवा आणि क्षीणभाग घालवण्यासाठी परंपरेनुसार गुरूवार दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘प्रक्षाळ पूजा’ आयोजित करण्यात आली आहे. श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ, मूळ मंदिर (श्रीक्षेत्र कोथळी) येथे सकाळी ०७:०० वाजता या विशेष पूजेला सुरुवात होईल.
यात्रोत्सवाची सांगता आणि प्रक्षाळ पूजेचे महत्त्व
दि. ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान संत मुक्ताईंचा भव्य यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कालावधीत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आईसाहेबांचे दर्शन घेतले. भक्तांच्या सोयीसाठी आणि दर्शनासाठी मंदिर सलग २४ तास खुले ठेवण्यात आले होते. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे आणि अखंड दर्शनामुळे आईसाहेबांनाही मानवी देहाप्रमाणे थकवा (क्षीणभाग) येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हाच थकवा दूर करण्यासाठी दरवर्षी यात्रोत्सवानंतर प्रक्षाळ पूजा करण्याची प्राचीन परंपरा श्रीक्षेत्र कोथळी येथे जोपासली जाते.
अशी असते प्रक्षाळ पूजा
प्रक्षाळ पूजेचे स्वरूप अत्यंत वेगळे आणि भावपूर्ण असते. ही पूजा प्रामुख्याने दोन भागात विभागली जाते:
१. स्वच्छता सेवा: उपस्थित भाविक आणि सेवेकरी मिळून मंदिराचा गाभारा आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करतात.
२. औषधी अभिषेक: आईसाहेबांचा थकवा दूर करण्यासाठी विविध नैसर्गिक आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून तयार केलेल्या ‘औषधी काढ्याने’ मूर्तीवर अभिषेक केला जातो.
यावेळी भाविक मूर्तीला ‘साखर-लिंबू’ लावून स्वच्छ करतात, ज्याला उटणे लावल्यासारखे मानले जाते. या सात्विक उपचारानंतर आईसाहेबांची आरती होऊन त्यांना खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
भाविकांना आवाहान
ही पूजा म्हणजे केवळ विधी नसून भक्तांसाठी आईसाहेबांच्या चरणी सेवा रुजू करण्याची एक अमूल्य संधी आहे. तरी या महापूजेस आणि स्वच्छतेच्या सेवेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ (मुळमंदिर,श्रीक्षेत्र कोथळी) येथून अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने केले आहे.
………
दिनांक: गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६
वेळ: सकाळी ०७:०० वाजेपासून
स्थळ: श्री संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ, श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर
विशेष: औषधी काढ्याचा अभिषेक आणि पुरणपोळीचा नैवेद्य






