Top 5 This Week

Related Posts

दादगाव येथे शास्त्रयुक्त वही गायन महोत्सव उत्साहात संपन्न; ग्रामीण कलावंतांना मिळाले व्यासपीठ

दादगाव (ता. नांदुरा, जि. बुलढाणा) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित वही गायन महोत्सव 2025-26 अंतर्गत दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दादगाव येथे शास्त्रयुक्त वही गायन स्पर्धा महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील पारंपरिक कला जोपासण्याच्या उद्देशाने हा महोत्सव गावपातळीवर आयोजित करण्यात आला होता.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांऐवजी ग्रामीण भागात असे महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना संधी मिळावी आणि खेड्यापाड्यातील कलावंत घडावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

महोत्सवाचे मार्गदर्शन खानदेश लोककलावंत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले. त्यांच्या परिश्रमातून आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा सांस्कृतिक सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

या शासकीय वही गायन महोत्सवात विविध मंडळांनी सहभाग घेतला. त्यामध्ये गणेश वही मंडळ, खामखेडा (ता. मुक्ताईनगर), जय मल्हार वही मंडळ, मुंजलवाडी (ता. रावेर) आणि नवनाथ वही मंडळ, निमगाव (ता. नांदुरा) आदी मंडळांचा समावेश होता. स्पर्धकांनी पारंपरिक शैलीत सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र व शासनाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला कलाकार उत्तम जुमडे, प्रकाश वाघ, सुरेश मराठे, सुरेश जुमडे, शिवलाल पाटील तसेच दादगाव व परिसरातील अनेक कलावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा हा वही गायन महोत्सव दादगावसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरला असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कला आणि कलाकारांना नवे बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles