जिल्ह्यातील ११ नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर; भाजप आघाडीव

Advertisement

बुलढाणा (जिमाका), दि. २१ : जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या अध्यक्षपद व सदस्यपद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांनी आपले सामर्थ्य दाखवले आहे. अध्यक्षपदाच्या निकालात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक चार नगराध्यक्षपदे जिंकत आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसला तीन ठिकाणी यश मिळाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी प्रत्येकी एका नगरपरिषदेवर विजय मिळवला आहे.

बुलढाणा नगरपरिषदेत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांनी नगराध्यक्षपद पटकावून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. चिखली नगरपरिषदेत भाजपचे पंडितराव रामराव देशमुख, जळगाव जामोद येथे भाजपचे गणेश रामेश्वर दांडगे, खामगाव नगरपरिषदेत भाजपच्या अपर्णा फुंडकर तर नांदुरा नगरपरिषदेत भाजपच्या मंगला सुधीर मुऱ्हेकर यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे.

Advertisement

काँग्रेसने लोणार नगरपरिषदेत मीरा भूषण मापारी, मलकापूर नगरपरिषदेत अतिकुर रहमान शाफिकूर रहमान तसेच शेगाव नगरपरिषदेत प्रकाश एकनाथ शेगोकार यांना नगराध्यक्षपदी निवडून आणले आहे. देऊळगाव राजा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी तुषार शिपणे, मेहकर येथे शिवसेना (उबाठा) गटाचे किशोर भास्कर गारोळे, तर सिंदखेड राजा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सौरभ विजय तायडे यांनी विजय संपादन केला आहे.

सदस्यपदांच्या एकूण २८६ जागांपैकी भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक संख्याबळ मिळवले आहे. काँग्रेसचे ६०, शिवसेनेचे ४६, राष्ट्रवादी काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे १३ तर शिवसेना (उबाठा) गटाचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय आघाडी, अपक्ष, एमआयएम, समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाही विविध ठिकाणी यश मिळाले आहे.

दरम्यान, देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणुकीत ७१.६७ टक्के मतदानाची नोंद झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Subscribe to Viral News Live