कोलते महाविद्यालयाची राष्ट्रीय भरारी; आयईआय अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने देशपातळीवरील शिक्कामोर्तब

Advertisement

मलकापूर :भारतीय अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ भरीव योगदान देणाऱ्या द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) – आयईआय या देशातील सर्वोच्च व प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार २०२५’ पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर तसेच महाविद्यालयाच्या पॉलिटेक्निक विभागाला प्राप्त झाला आहे. या यशामुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण पसरले आहे. हा राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार १९ डिसेंबर रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दुर्गापुर, कोलकाता येथे ४०व्या इंडियन इंजिनिअरिंग काँग्रेस आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी देशभरातील नामांकित अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. बहिस्तरीय व कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर कोलते महाविद्यालयाची निवड होणे, ही बाब महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची व शिस्तबद्ध कार्यसंस्कृतीची साक्ष देणारी आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अमोघ मोलोकार तसेच पॉलिटेक्निक विभागाचे शैक्षणिक समन्वयक प्रा. मनोज वानखडे यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. आयईआयचे अध्यक्ष व्ही. बी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे सेक्रेटरी व डायरेक्टर जनरल मेजर जनरल डॉ. मोहनजित सिंग स्याली यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयईआय ही संस्था अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्ता, संशोधन, औद्योगिक सहभाग व राष्ट्रीय निकष निश्चित करण्यात अग्रगण्य भूमिका बजावत आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने आयईआयला वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संघटना म्हणून मान्यता दिलेली आहे. विशेष म्हणजे एआयसीटीई व एनबीए अस्तित्वात येण्यापूर्वी आयईआय हीच देशातील एकमेव मान्यतादार संस्था होती, ही बाब या पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित करते.

Advertisement

हा मानाचा पुरस्कार प्राप्त होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. युगेश खर्चे, प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे, इतर सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, प्रशासकीय अधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत निष्ठेने व सातत्याने परिश्रम घेतले. गुणवत्तापूर्ण अध्यापन, अद्ययावत प्रयोगशाळा, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, संशोधनाभिमुख वातावरण आणि शिस्तबद्ध शैक्षणिक धोरण यामुळेच हे यश साध्य झाले, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळातर्फे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे तसेच सर्व संचालक व सदस्यांनी प्राचार्य, प्राध्यापक, व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नसून, विद्यार्थ्यांना दर्जेदार, मूल्याधारित व भविष्याभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याच्या कोलते महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक वाटचालीस मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील पावती असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Subscribe to Viral News Live