कुऱ्हा बायपास रस्त्यासाठी आ. एकनाथराव खडसे यांचा पाठपुरावा

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी….
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता, मलकापूरकडे जाणारा स्वतंत्र बायपास रस्ता तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कुऱ्हा हे परिसरातील व्यापाराचे प्रमुख केंद्र असून, गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच शाळा, बँका, शासकीय कार्यालये आणि मोठी बाजारपेठ आहे. यामुळे या ठिकाणी नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची दिवसभर मोठी वर्दळ असते, याकडे आ. खडसे यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरूनच मलकापूरकडे जाणारी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर धावत असल्याने गावात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. गावांतर्गत रस्ते अरुंद आहेत आणि बाजारपेठेतील गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता कुऱ्हा गावासाठी स्वतंत्र बायपास रस्ता व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे.
वाहतुकीची कोंडी, अवजड वाहने आणि सार्वजनिक सुरक्षितता विचारात घेऊन मलकापूरकडे जाणाऱ्या कुऱ्हा बायपास रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करावे, त्याचे अंदाजपत्रक तयार करून कामाला प्रशासकीय मान्यता द्यावी आणि हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा, अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Subscribe to Viral News Live