उर्दू माध्यम शाळांतील शिक्षक भरतीचा प्रश्न गंभीर संग्रामपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक; कलीम शेख यांची उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे उच्चस्तरीय बैठकीची ठाम मागणी

Advertisement

संग्रामपूर (प्रतिनिधी) – जिल्हा बुलढाणा :
महाराष्ट्रातील उर्दू माध्यम शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या शिक्षक पदांमुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिक्षण गंभीर संकटात सापडले आहे. या ज्वलंत व संवेदनशील प्रश्नाकडे शासनाचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे तालुका अध्यक्ष कलीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे सविस्तर विनंती अर्ज सादर केला आहे.

या अर्जामध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगरपालिका अंतर्गत कार्यरत उर्दू माध्यम शाळांमधील तीव्र शिक्षक टंचाईचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे प्रत्यक्षात रिक्त असतानाही पवित्र पोर्टलवर रिक्त जागा व विद्यार्थी पटसंख्या अचूकपणे दर्शविली जात नाही, त्यामुळे पात्र व प्रशिक्षित उर्दू माध्यम शिक्षकांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत असल्याचे कलीम शेख यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

Advertisement

संग्रामपूर तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर

विशेष बाब म्हणजे संग्रामपूर तालुक्यातील उर्दू माध्यम शाळांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांच्या अभावामुळे अध्यापन प्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, मानसिक विकास व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यावर होत आहे, असे शेख यांनी अधोरेखित केले.

आरटीई कायद्याचे स्पष्ट उल्लंघन

कलीम शेख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) 2009 व त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक भरती करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अपुरी व विलंबित भरती होत असल्याने उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, अल्पसंख्यक समाजाच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

उच्चस्तरीय बैठकीची ठाम मागणी

या पार्श्वभूमीवर कलीम शेख यांनी माननीय शिक्षण संचालक, पुणे तसेच शिक्षक सचिव, मंत्रालय, मुंबई यांच्या उपस्थितीत पक्षस्तरावर तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची ठाम मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

बैठकीत खालील मुद्द्यांवर निर्णय होण्याची अपेक्षा –

पवित्र पोर्टलवरील रिक्त शिक्षक पदांची अचूक व पारदर्शक नोंद

आरटीई कायदा व विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे

उर्दू माध्यम शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क सुरक्षित करणे

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी निर्णायक पाऊल

या विषयावर शासनाने ठोस व सकारात्मक निर्णय घेतल्यास अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण होईल तसेच उर्दू माध्यम शिक्षणाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास कलीम शेख यांनी व्यक्त केला आहे.

Subscribe to Viral News Live