अवैध दारूविरुद्ध धाड पोलिसांची मोठी कारवाई; सराईत आरोपी तीन महिन्यांसाठी तडीपार

अवैध दारूविरुद्ध धाड पोलिसांची मोठी कारवाई; सराईत आरोपी तीन महिन्यांसाठी तडीपार
अवैध दारूविरुद्ध धाड पोलिसांची मोठी कारवाई; सराईत आरोपी तीन महिन्यांसाठी तडीपार
Advertisement

धाड (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला धाड पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. धाड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

धाड (ता. बुलढाणा) पोलीस स्टेशन हद्दीतील चौथा (ता. जि. बुलढाणा) येथील रहिवासी देवसिंग फकीरा बिबे (वय ४०) हा इसम अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धाड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.

Advertisement

सदर प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१)(अ)(ब) अन्वये १७ ऑगस्ट २०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत बुलढाणा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि आरोपीवरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन १९ डिसेंबर २०२५ रोजी आरोपीला तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

या कारवाईनंतर ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा धाड ठाणेदार प्रताप भोस यांनी दिला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार युवराज मुळे आणि नितीन माळोदे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

Subscribe to Viral News Live