साकरी येथे दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या; तालुक्यात खळबळ

Advertisement

भुसवाल फेकरी ता़ भुसावळ (वार्ताहार):- तालुक्यातील साकरी गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत मुली या साकरी गावातील रहिवासी असून त्या नियमितपणे शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या सुमारास गावाजवळील एका विहिरीत ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात कारणातून दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच गावात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली. संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याच्यावर गंभीर आरोप करत त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी संशयिताला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले असताना काही ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यास झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मृत मुलींचे मृतदेह लवकरात लवकर कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांकडून संशयित आरोपीची सखोल चौकशी सुरू असून, हत्या नेमकी कशामुळे व कोणत्या परिस्थितीत करण्यात आली, याचा तपास केला जात आहे. अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी या घटनेमुळे साकरीसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालकवर्गातही मोठी चिंता व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here