संदीप जोगी मुक्ताईनगर…..
राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीकडे मुक्ताईनगर तालुक्यासह राज्याचे लक्ष लागून आहे. नगरपंचायत निवडणुकी मधून माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी माघार घेतल्याने सुनेच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी राजकीय खेळी आमदार खडसे यांनी केली होती. आता मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकी प्रसंगी सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासाठी छुपा पाठिंबा सर्वश्रुत असल्याचे दिसून येते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचेसह आमदार एकनाथराव खडसे तसेच विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे मानले जात आहे.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार असले तरी मुक्ताईनगर येथे खडसे परिवार व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचे वैर हे सर्वश्रुत आहे. शहरातील राजकीय सामाजिक समीकरणे जुळवत ही निवडणूक यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीमध्ये भारतीय काँग्रेस पार्टी पक्षातर्फे ही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. अपक्ष उमेदवारांसह त्यांचाही जोर काही कमी नाही.
_ 25 नोव्हेंबर रोजी अधिकृत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी चिन्हासह प्रसिद्ध होणार असून नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने विद्यमान विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या कन्या शिवसेना ( शिंदे गट) पक्षातर्फे संजनाताई चंद्रकांत पाटील या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. तर मुक्ताईनगर ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक यांच्या पत्नी भावनाताई ललित महाजन ह्या भाजपा पक्षातर्फे निवडणूक रिंगणात आहेत . ललित महाजन देखील प्रभाग क्रमांक एक मधून नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. पती-पत्नी दोघे मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत आहे.
_ नगराध्यक्ष पदासाठी सरळ लढत होणार असून यासह प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकास एक अशी सरळ लढत होणार आहे.






